चिमुकलीचा गळा घोटून पित्याची आत्महत्या : पोलीस कर्मचाऱ्याच्या टोकाच्या निर्णयाने शहर सुन्न
दैनिक राष्ट्र उदय विशेष प्रतिनिधी, नाशिक
नाशिकरोड परिसरात एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या स्वप्निल दीपक गायकवाड (वय 34) या अंमलदाराने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा घोटून खून केला आणि नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. ही दुहेरी घटना समजताच नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला.

स्वप्निल हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल रात्री उशिरा त्यांच्या घरात ही घटना उघडकीस आली. भैरवी स्वप्निल गायकवाड (वय 6) ही बालिका पाळणा बांधण्याच्या लोखंडी हुकाला गळफास लावून मृतावस्थेत सापडली, तर बाजूलाच स्वप्निल गायकवाड यांचा ही मृतदेह आढळून आला.
कौटुंबिक विघटन, तणाव आणि आत्मविस्मृती
स्वप्निल यांचा काही महिन्यांपूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला होता. कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांना इतरांचे जीवन वाचवण्याचं काम असतं, पण येथे स्वतः पोलीसच हतबल होऊन जग सोडून गेला.

स्वप्निल यांच्या पश्चात त्यांचे वृद्ध आई-वडील एकटे उरले आहेत. काही वर्षांपूर्वी एका भावाचा गंभीर आजाराने मृत्यू झाला होता आणि दुसऱ्या भावाने पाच वर्षांपूर्वी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. अशा काळात एकमेव आधार असलेला मुलगाही गेला आणि त्यांच्या जीवनात अंधार दाटून आला.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.
मन सुन्न करणारे प्रश्न
आजवर अनेकांनी आत्महत्येपासून माघार घ्यावी म्हणून सल्ले दिलेले असतात, समुपदेशन केलेले असते. पण ज्याच्या खांद्यावर इतरांना आधार देण्याची जबाबदारी होती, तोच जर तुटून पडला, तर मग समाजाने विचार करायला हवं नाही का?
एक चिमुकली – निष्पाप, निरागस आणि जीवनाच्या सुरुवातीला असलेली – तिला या जगातून का जावं लागलं? तिचा काय दोष होता? कोण म्हणतं फक्त महिला हतबल होतात – येथे एक पुरुषही तुटून कोसळला, आणि संपूर्ण समाजासाठी एक गंभीर संदेश ठेवून गेला.

तरुण पिढीला साकडे
आज आपल्या भोवतालच्या तणाव, कौटुंबिक संघर्ष, नात्यांतील दुरावा आणि मानसिक आरोग्य याबद्दल बोलणं गरजेचं झालं आहे. कोणताही निर्णय शेवट नसतो. आई-वडिलांचा, आपल्या लोकांचा विचार करा. तुम्ही हरलात, तर तुमचं संपूर्ण घर हरतं.
हा शोकांतिकेचा प्रसंग तरुण पिढीला जागं करेल का? की अजूनही आपण सोशल मीडियावर फिल्टर लावून जीवनाला झाकत बसू?
आत्महत्येचा विचार मनात आला, तर थांबा… विचार करा… आणि मदत घ्या.
> जीवन अमूल्य आहे. संकटं आली की मोडायचं नाही – झेलायचं आणि उभं राहायचं.

🙏 भैरवी आणि स्वप्निल यांच्या आत्म्यास शांती लाभो…
आई-वडिलांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

